मुक्ताईनगर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
जळगाव, दि. 27 – जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत.
मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसाचा फटका अनेक गावांना बसला. यात अंतुर्ली मंडळातील उचंदा, शेमळदेसह अनेक गावातील परिसरामध्ये मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांच्याशी संपर्क साधून दिली तसेच याबाबत शासकीय मदत मिळवून देण्याचीही मागणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिलेत. झालेल्या नुकसानीची शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देवू, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी कळविले आहे.