वारसा हक्कापासून विज कर्मचारी वंचित
वीज कंपनीचे दुर्लक्ष न्यायासाठी पाचोर्यातील आदिवाल यांचा आत्मदहनाचा इशारा
पाचोरा ( प्रतिनिधी )-: पाचोरा येथील रहिवासी हरीश आदिवाल यांना पाचोरा विज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे सफाई कर्मचारी आयोगाच्या शिफारशीनुसार वारस हक्कापासून अद्याप न्याय मिळालेला नाही. तसेच जळगाव परिमंडळ कार्यालयाने सामाजिक न्याय विभाग मंत्रालय यांना दिलेली माहिती चुकीची व शासनाची दिशाभूल करणारी आहे. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशी प्रमाणे वारस हक्क डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा पाचोरा येथील वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी हरीष आदिवाल यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (मुंबई) व मुख्य अभियंता (जळगाव) यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की प्रकृतीच्या कारणामुळे मी 30 मार्च 2007 रोजी सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिन्या अगोदर राजीनामा दिला आहे. त्यानंतर वीज कंपनीने माझी कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता 31 मे 2007 रोजी माझा राजीनामा मंजूर केला होता. माझ्या बायपास सर्जरीसाठी कार्यालयाने 1 लाख 19 हजार 536 रुपयाचे बिल मंजूर करून याबाबतची रितसर सेवा पुस्तकात नोंद केली आहे. असे असताना देखील जळगाव परिमंडळ कार्यालयाने 8 मार्च 2019 रोजी सामाजिक न्याय विभागाचे अप्पर सचिव यांना ‘आदिवाल यांनी प्रकृती कारणास्तव कंपनीच्या सेवेचा राजीनामा दिलेला असल्यामुळे व त्यामध्ये कोणत्याही “गंभीर’आजाराची नोंद नसल्याचे नमूद केले आहे. ही बाब माझ्यावर अन्याय करणारी आहे त्यामुळे आपण योग्य ती चौकशी करून मला न्याय द्यावा अन्यथा मी आत्मदहन करेल असा इशारा हरीश आदिवाल यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती त्यांनी अनुसुचित जाती जमाती आयोग वरळी, मुख्य अभियंता जळगाव, कनिष्ठ विधी अधिकारी परिमंडळ कार्यालय महावितरण जळगाव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी जळगाव, मुख्य तपास अधिकारी महावितरण मुंबई, यांना पाठवल्या आहेत.