विकास कामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा जनतेला लाभ मिळवून द्या- आ.किशोर पाटील
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पाचोरा(वार्ताहर) दि,६
सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातुन सुरू असलेल्या अनेक कल्याणकारी योजनांच्या लाभासह महिला बचत गट, शेतकरी युवावर्ग, उद्योजक आदी घटकांना विश्वासात घेऊन पाचोरा भडगाव मतदार संघात सुरू असलेल्या विकासकामांसोबतच व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा देखील फायदा जनतेला मिळवुन देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी जोमाने कामाला लागावे तसेच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची विजयी पताका फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाची अनोखी भेट द्यावी असे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केले असून रविवारी संध्याकाळी सहा वाजता शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ईश्रम कार्ड कार्डच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आरोग्य सुविधा, महिला बचत गट सक्षमीकरण व त्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार निर्मिती तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम ही आगामी काळातील आपल्या कामाची त्रिसूत्री व प्राधान्यक्रम आपण ठरवला असून त्यासाठी प्रत्यक जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क कार्यालय आपण सुरू करत असून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व आमदार देखील आपले हक्काचे असल्याने त्यांच्या माध्यमातून जनतेला सुविधा देतांना कार्यकर्त्यानी नैतिकता व नीतिमत्ता शाबूत ठेऊन काम करावे शिवाय स्वतःची स्वतंत्र्य ओळख निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील,शहर प्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, डॉ भरत पाटील,बाजार समितीचे माजी संचालक शिवदास पाटील,डॉ सुनील देवरे(लासुरे),चंद्रकांत धनवडे, प्रवीण ब्राह्मणे ,अनिल धना पाटील, यांची उपस्थिती होती.