हिरक मोहत्सवी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२५

हिरक मोहत्सवी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२५

पुणे, धाराशिव ठरले अजिंक्य

मुंबई उपनगर व सांगलीला उपविजेतेपद

 

शेवगाव, ता. १७ : धाराशिवने सांगलीचा तर पुण्याने मुंबई उपनगरचा पराभव करीत हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. पुण्याने ही कामगिरी सलग दुसऱ्या वर्षी केली, तर महिला गटामध्ये धाराशिवने यंदा धडाकेबाज कामगिरी करत विजेतेपदावर मोहर उमटवली.

 

थरारक अंतिम सामने

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अहमदनगर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान, मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शेवगाव येथील खंडोबा क्रिडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

महिला गट : धाराशिवचा रोमांचक विजय

महिला गटातील अंतिम सामन्यात धाराशिव संघाने सांगलीचा १ डाव १ गुणांनी (११-१०) पराभव केला. पहिल्या डावात सांगली संघाला केवळ ५ गुण मिळवता आले, तर धाराशिवने आक्रमक खेळ करत ११ गुण मिळवले. मध्यंतराला धाराशिवकडे ६ गुणांची आघाडी होती, जी सांगलीला पार करता आली नाही. दुसऱ्या आक्रमणात सांगलीला फक्त ५ गुण मिळवता आले, त्यामुळे धाराशिव संघाने सहज विजय मिळवला.

धाराशिवतर्फे संध्या सुरवसे (३.१०, १.४० मि. संरक्षण व १ गुण), संपदा मोरे (१.२० मि. संरक्षण व २ गुण), अश्विनी शिंदे (१.४०, २.५० मि. संरक्षण व २ गुण), तन्वी भोसले (२.००, २.४० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. तर सांगलीकडून रितिका मगदूम (१.३० मि. संरक्षण व ५ गुण), प्रतीक्षा बिराजदार (१.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी चांगली कामगिरी केली.

 

पुरुष गट : पुण्याच्या विजयाचा सलग दुसरा हंगाम

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा ४ गुणांनी (१८-१४) पराभव केला. मध्यंतराला ३ गुणांची (१०-७) घेतलेली आघाडी पुणे संघाने कायम ठेवली. पुण्याकडून शुभम थोरात (१.५०, २.४० मि. संरक्षण व १ गुण), प्रतीक वाईकर (१.२० मि. संरक्षण व ३ गुण), अथर्व देहेण (१.२०, १ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची भूमिका बजावली. मुंबई उपनगरकडून निहार दुबळे (२, १ मि. संरक्षण), ओंकार सोनावणे (१, १.२० मि. संरक्षण व २ गुण), अनिकेत पोटे (४ गुण) यांनी चांगली खेळ केला, पण संघाला विजय मिळवता आला नाही.

 

सन्मान आणि पुरस्कार वितरण

दरम्यान, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या शुभम थोरातला छत्रपती संभाजी राजे व धाराशिवच्या संध्या सुरवसेला राणी अहिल्याबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट खेळाडू : शुभम थोरात (पुणे), संध्या सुरवसे (धाराशिव)

उत्कृष्ट संरक्षक : अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर), अश्विनी शिंदे (धाराशिव)

उत्कृष्ट आक्रमक : सुयश गरगटे (पुणे), सानिका चाफे (सांगली)

या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.