यात्रेत मुस्लिम समाजाच्या बंदीच्या वादग्रस्त ठरावास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देऊन ही मढीच्या ग्रामसभेत पुन्हा 127 विरोधात 327 च्या बहुमताने ठराव मंजूर ?

यात्रेत मुस्लिम समाजाच्या बंदीच्या वादग्रस्त ठरावास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देऊन ही मढीच्या ग्रामसभेत पुन्हा 127 विरोधात 327 च्या बहुमताने ठराव मंजूर ?

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌‌ संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या आणि भटक्यांची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मढीतील यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदीच्या वादग्रस्त ग्रामसभा ठरावास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देऊन ही मढीच्या ग्रामसभेत पुन्हा एकदा नव्याने 127 विरोधात 327 च्या बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला. या बाबतची माहिती अशी की मढी‌ ग्रामपंचायतीने दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसभा घेऊन मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास बंदीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हा ठराव असंविधानिक असल्याचा दावा मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी यांच्या कडे करण्यात आला होता. पाथर्डीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी मढीच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आला होता.आता मंगळवार दिनांक 11 मार्चला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मढीच्या यात्रेतील वादग्रस्त ठरावास स्थगिती दिली होती. मढी ग्रामस्थांचे म्हणणे आहे की कानिफनाथ यात्रेला फार मोठी परंपरा आहे.महिनाभर चालणारी ही यात्रा मढीच्या ग्रामस्थासाठी दुखवट्याचा काळ असतो.या काळात ग्रामस्थ तेलात तळलेले पदार्थ खात नाहीत.तसेच पलंग आणि गादीचा वापर करत नाहीत.मात्र मेंढीच्या यात्रेतील मुस्लिम समाजाचे व्यापारी या परंपरा पाळत नाहीत यामुळे भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचते असे मढीच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे मढीच्या ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना मढी यात्रेत दुकानं लावण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. या ठरावाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रांतिक सरचिटणीस ॲडहोकेट प्रतापराव ढाकणे,मुकद्दर पठाण,व फिरोज शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.न्यायमुर्ती मंगेश पाटील, आणि न्यायमूर्ती खोब्रागडे यांच्या समोर सुनावणी होऊन खंडपीठाने या ठरावास मंगळवार दिनांक 11 मार्चला स्थगिती दिली आहे. सदर याचिकेत असे म्हटले होते की सरपंच मरकड यांनी 22 फेब्रुवारी रोजी दोन समाजातील धर्मात तेढ निर्माण करणारा असंविधानिक ठराव मंजूर केला आहे.सरपंच मरकड यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.ॲडव्होकेट संतोष जाधवर आणि ॲडव्होकेट संजय सानप यांनी हे काम पाहिले.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या वादग्रस्त ठरावास स्थगिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे,पाथर्डी काॅंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष नाशिरभाई शेख, फिरोज शेख, वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसनराव चव्हाण,मुकद्दर पठाण, पापाभाई शेख,जान महंत पठाण, नितीन लवांडे, नाथा वाबळे, आणि विविध संघटना यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.औरंगाबाद खंडपीठाच्या निकाला नंतर बुधवार दिनांक 13 मार्च 2025 रोजी मढी ग्रामपंचायतीने सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा ऑन रेकॉर्ड पोलिस बंदोबस्तात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत,असे सांगितले गेले की मढीच्या मुस्लिमांना आमचा विरोध नाही पण आम्ही प्रसाद दिला तर तुम्ही खात नाहीत मग आमच्या देवाचा प्रसाद तुम्ही खानार नसाल तर विकता तरी कशाला असा सुर आवळण्यात आला. तसेच लेकी बाळींची छेडछाड,स्वराट नावाचा जुगार, मटका जुगार, मांसविक्री, पशुहत्या करता,जाती जातीत भांडणं लावता,असा आरोप करण्यात आला.आणि रुढी परंपरा न पाळणाऱ्या विषयी निर्णय घेण्यासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली असून या विषयावर सर्व ग्रामस्थांसमोर निर्णय घेण्यात येणार आहे असे सांगितले गेले.गावाच्या रुढी परंपरा न पाळणाऱ्याच्या विरोधात या ग्रामसभेत पुन्हा नव्याने ठराव मंजूर करण्यात आला. ठरावाच्या समर्थकांनी जय श्रीराम,जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत फटाक्यांच्या आतषबाजीत या निर्णयाचे स्वागत केले.न्यायालयाने 22 फेब्रुवारीच्या ग्रामसभेच्या ठरावाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे व पुढील सुनावणी आठ एप्रिल ला ठेवण्यात आली आहे.नव्याने ग्रामसभा घेण्यासाठी न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध घातला नसल्याने आज केवळ यात्रेच्या विषयावर ग्रामसभा घेण्यात आली.असे सरपंच संजय मरकड यांचे म्हणणे आहे.ही ग्रामसभा सुरू असताना अनेक वेळा शाब्दिक चकमकी झाल्या.एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले.या ग्रामसभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पाथर्डीचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.या ग्रामसभेनंतर मात्र मढी,तिसगाव, करंजी,निवडुंगे पाथर्डी,जवखेडे,मीरी या ठिकाणी तणावजंन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण याच ठिकाणच्या व्यापाऱ्यांची मढीच्या यात्रेत दुकानं लावण्यासाठी गर्दी असते.या ग्रामसभेसाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, फिरोज शेख, प्रदिप पाखरे,सालर शेख, विष्णू मरकड, समाधान मरकड,नंदकिशोर मरकड, गणेश पाखरे यांनी या ग्रामसभेत चर्चा करण्यासाठी भाग घेतला.प्रभारी ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी सुचवले. या ग्रामसभेत चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने दोन गट पडले होते. आजच्या ठराव नेमका काय होतो याकडे संपुर्ण महाराष्ट्रा चे लक्ष लागले होते कारण मंत्री नितेश राणे, अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप,अनेक संत महंत यांनी जाहीर सभा घेऊन या ठरावाला पाठिंबा दिला होता. पाथर्डीतील शांतता समितीच्या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मढीच्या यात्रेत जातीय तेढ, धार्मिक तणाव निर्माण होउन यात्रेत अडथळा निर्माण झाल्यास कडक कारवाईचा बडगा उगारला होता. या ग्रामसभेत मढी गावातील मतदार यादीत ज्यांची नावे आहेत त्यांनी उपस्थित रजिस्टरला सही केली असेल त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार राहील असे सांगितले होते. ग्रामसभेत दोन गट पडले होते.ठरावाच्या विरोधात डाव्या बाजूला तर ठरावाच्या बाजूने उजव्या बाजूला बसविण्यात आले होते. ठरावाच्या बाजूने 327 जणांनी मतदान केले तर विरोधात 127 जणांनी मतदान केले.मढीच्या यात्रेत बाहेरच्या व्यापाऱ्यांना बंदी हा ठराव मंजूर करण्यात आला.फक्त (मुस्लिम)हा शब्द वगळण्यात आला आहे.ग्रामसभेचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांनी तर आभार सरपंच संजय मरकड यांनी मानले. वंचित आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख यांनी सांगितले की मढी ग्रामपंचायतीने पुन्हा घेतलेला ग्रामसभेचा हा ठराव म्हणजे उघड उघड न्यायालयाच्या या ठरावास स्थगिती आदेशाचा अवमान असुन या विरोधात पुन्हा नव्याने आवाज उठवला जाईल असे सांगितले.मढीच्या यात्रा काळात सर्व भाविकांनी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि पोलिस प्रशासन यांना विशेष सहकार्य करण्याचे आवाहन पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी केले आहे.