३८ वी नॅशनल गेम्स खो-खोत महाराष्ट्रचा डबल धमाका महिला व पुरूष संघाला सुवर्णपदक
महाराष्ट्र पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर
हल्दवणी, क्री. प्र. १ फेब्रु. ३८ व्या नॅशनल गेम्समध्ये (राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत) खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रच्या महिला आणि पुरूष संघाने ओरिसाच्या दोन्ही संघांवर मात करत डबल धमाका साधला आहे. महिला आणि पुरूष संघानी सुवर्णपदकाला गवसणी घातली. या विजयामुळे महाराष्ट्र राज्य पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे.
उत्तराखंड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आज झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिसावर चूरशीच्या सामन्यात ३ गुणांनी (३१-२८) असा पराभव केला. मध्यंतराला महाराष्ट्र कडे तीन गुणांची (१५-१२) आघाडी होती. दुसऱ्या सत्रात ती आघाडी कायम राखण्यात महाराष्ट्राला यश आले. त्यामुळे हा विजय सुकर झाला. विजयी महाराष्ट्रातर्फे प्रियांका इंगळे (१.३०, १.५२ मि. संरक्षण आणि ४ गुण), अश्विनी शिंदे (१.२३ मि. संरक्षण व १० गुण), संध्या सुरवसे (२.२४, २.२३ मि. संरक्षण व २ गुण), रेश्मा राठोड (१.११, १.४५ मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. तर ओडिसा तर्फे अर्चना प्रधान (१, १.३५ मि. संरक्षण आणि ४ गुण), सुभश्री सिंग (१.८ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी चांगला खेळ केला.
पुरूष गटात महाराष्ट्राने ओडिसाचा सव्वा सात मिनिटे राखून ६ गुणांनी (३२-२६) पराभव केला. त्यात महाराष्ट्राच्या रामजी कश्यप (२.२० मि., १.१० मि. संरक्षण व २ गुण), सुयश गरगटे (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), अनिकेत चेंदवणेकर (१ मि. व २ मि. संरक्षण), प्रतिक वायकर (१ मि. संरक्षण व ६ गुण), शुभम थोरात (१.३० मि., १.२० मि. संरक्षण आणि २ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. पराभूत संघातर्फे पाबनी साबर (१ मि. संरक्षण व ६ गुण), सुनिल पात्रा (१.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली लढत संघाच्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही.
उत्तराखंड येथे सुरू असलेल्या या नॅशनल गेम्समध्ये सर्व खेळात महाराष्ट्रच्या पथकाने चांगली कामगिरी बजावली आहे. खो-खो स्पर्धेतील यशामुळे पदक तालिकेत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत १० सुवर्ण, १६ रौप्य, ११ कांस्य पदके मिळाली आहेत. खो-खो संघाने सुवर्णमय कामगिरी केल्याबद्दल दोन्ही संघाचे खेळाडू, प्रशिक्षक राजेंद्र साप्ते, पंकज चवंडे यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.
———————————————————————–
सलग चार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघाने सुवर्णमय कामगिरी केली आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. यासाठी सर्व जिल्हा संघटना, राज्य शासनाचे क्रीडा खाते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडा मंत्री भरणे यांचे मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळात होणाऱ्या स्पर्धामध्ये महाराष्ट्र अव्वल कामगिरी करीत राहील याची खात्री देतो.- डॉ. चंद्रजित जाधव, सचिव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन
———————————————————————-
उत्तराखंडच्या अतिशय प्रतिकूल व थंड वातावरणात महाराष्ट्राच्या मुलांनी खूप कष्टाने व मेहनतीने मिळवलेल्या या सुवर्णपदकांनी महाराष्ट्राला आज प्रथम क्रमांकावर स्थान मिळवून दिल्याबद्दल पथक प्रमुख या नात्याने मी खो-खो खेळाडूंचे अभिनंदन करतो. संजय शेटे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन).