बोधेगावच्या पहिलवान बाबा मंदिरातील पुजाऱ्याचे मुंडके एका विहिरीत तर धड दुसऱ्या विहिरीत, बुवाबाजीतून हा खुन झाल्याची गावभर चर्चा
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र शासनाने बुवाबाजी विरोधातील विध्येयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर करून घेतले तरीही राज्याच्या मंदिरातील बुवाबाजी थांबायला काही तयार नाही. बुवाबाजीतून असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील पहिलवान बाबा मंदिरात घडला आहे. या बाबची घटना अशी की बोधेगाव पासून उत्तरेला अडीच किलोमीटर अंतरावर एकबुर्जी वस्तीवर पहिलवान बाबांचे मोठे मंदिर आहे.या मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून एकनाथ भानुदास घोरतळे हे गेल्या पंधरा वर्षांपासून काम पहात आहेत. त्यांच्या मदतीला नागलवाडी ता. शेवगाव येथील मागासवर्गीय समाजातील नामदेव रामा दहातोंडे अंदाजे (वय७०)हे मंदिरातील व मंदिरा भोवतालची साफसफाई करण्याचे काम करत होते.२६ जानेवारीच्या शुभमुहूर्तावर देशभर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी संपूर्ण देशभरातील सरकारी आणि निमसरकारी यंत्रणा धडपडत होती. ईकडे मात्र शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील पहिलवान बाबा मंदिरातील साफसफाईचे काम पाहणारे पुजारी (सफाई कामगार) नामदेव रामा दहातोंडे हे अचानक मंदिर परिसरातून बेपत्ता झाल्याची मिसिंगची तक्रार मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ घोरतळे यांनी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती.शेवगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून संशयास्पद हालचाली वरून एकास संशयित म्हणून ताब्यातही घेतले. नंतर तीस जानेवारी रोजी सकाळी बेपत्ता नामदेव दहातोंडे यांचे रक्ताने माखलेले आणि अर्धवट जळालेले रुमाल व स्वेटर सापडले.मंदिराच्या पाठीमागिल भागातील सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या विहिरीत नामदेव दहातोंडे यांचे मुंडके पाण्यावर तरंगताना दिसले.मग मंदिरातील मुख्य पुजारी घोरतळे यांनी तात्काळ शेवगाव पोलिस स्टेशनला कळविले.पोलिसांनी विहिरीत बाज सोडून ते मुंडके वर काढून दहातोंडे यांच्या मुलांकडून ओळख पटवून घेऊन ते उत्तरिय तपासणी साठी अहमदनगरला पाठवून दिले.मयत नामदेव दहातोंडे यांचे धड हे विहिरीत मिळेल म्हणून सदर विहिरीवर दोन विजपंप बसविले. विजपंपाच्या सहाय्याने विहिरीतील सर्व पाणी उपसले पण धड काही मिळाले नाही.मग अहिल्यानगर येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने विहीरीपासुन काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या अविनाश कदम यांच्या कोरड्या विहिरीत मयताचे धड असल्याचे दाखवून दिले.जिल्हा पोलिस अधीक्षक रॉकेशजी ओला साहेब यांनी लगेचच घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली.आणि मुख्य तक्रारदार एकनाथ घोरतळे यांच्याशी गुप्त चर्चा केली.घटना घडल्या पासून शेवगाव चे पोलिस उपअधीक्षक (डी वाय एस पी) सुनिल पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, अशोक काटे, बोधेगाव दुरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र ससाणे, पोलिस नाईक ईश्वर गर्जे, एकनाथ गर्कळ हे घटनास्थळावर नजर ठेवून होते.नामदेव दहातोंडे हे मागासवर्गीय समाजातील असल्याने या घटनेच्या तपासासाठी सर्व पक्षीय मागासवर्गीयांच्या संघटनांनी बोधेगाव बंद ची हाक दिली होती. तो बंद यशस्वी झाला.याबाबत अगोदर मिसिंग, नंतर अकस्मात, आणि नंतर वाढीव कलमाखाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 91/2025 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.शेवगावचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे, यांनी घटनास्थळी भेट देऊन एका व्यक्तीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.मयत दहातोंडे यांना पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.या खुनाच्या गुन्ह्यासाठी नेमकं काय कारण आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.दोन वर्षापुर्वी याच पहिलवान बाबा मंदिरातील मुर्तीची एका पुजाऱ्यानी तोडफोड करून विटंबना केली होती. आणि मुर्ती विहिरीत टाकल्या होत्या. आणि मुर्ती फोडून विहिरीत टाकलेल्या व्यक्तींचे नाव या मयत नामदेव दहातोंडे यांना माहिती होते.त्याचवेळी ही माहिती मयत दहातोंडे यांनी ग्रामस्थांना आणि शेवगाव पोलिसांना सांगून टाकली होती.याचा सुड उगवण्यासाठी म्हणून हा खुनाचा गुन्हा घडला असल्याची चर्चा गावभर सुरू आहे.मुर्ती विटंबने बाबद त्यावेळी शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दहातोंडे मुळेच आपलं मुर्ती फोडल्याचे बिंग फुटले होते.म्हणून मुर्ती फोडणाऱ्यानेच दहातोंडे यांचा कायमचा काटा काढला असावा अशी बोधेगाव परिसरातील पहिलवान बाबा मंदिरा जवळ कुजबुज सुरु आहे.दोन पुजाऱ्याच्या वादातून हा खुन झाला असल्याची चर्चा बोधेगाव परिसरात सर्वत्र ऐकू येत आहे.पोलिसांनी कसुन चौकशी करावी आणि या घटनेतील आरोपीला फासावर लटकावे अशी भाविकांची मागणी आहे. बुवाबाजीतील करणी कवटालच्या आणि अंधश्रद्धेच्या स्पर्धेतून ही हत्या घडली असावी असे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.दहातोंडे आणि त्यांचे एक काशिद नावाचे नावांचे ग्रुहस्थ तेथे अंगारे धुपारे करीत होते.लोकांना काशिद ऐवजी दहातोंडे यांचाच चांगला गुण येवू लागला म्हणून मयत दहातोंडे यांच्याकडे जास्त प्रमाणात भाविकांची गर्दी जमा होऊ लागली होती.हे काशिद यांना सहन होत नव्हते म्हणून दोघांच्या मध्ये अनेक वेळा वादही झाले होते. केवळ ईर्षेपोटी ही हत्या घडल्याची चर्चा परिसरात हळू आवाजात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सत्तावीस तारखेला बुधवारी मौनी अमावस्या होती.अंधश्रध्देतून हा नरबळीचा प्रकार तर नाही ना? याचाही पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकंदरीत बुवाबाजीतूनच ही हत्या घडली असल्याची अशी चर्चा सुरू आहे.या मंदिरातील बुवाबाजी पोलिसांनी कायमची बंद करावी.बुवाबाजी विरोधातील विध्येयक विधानसभेत मंजूर झाले असताना ही बोधेगाव परिसरात बुवाबाजीचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्याला प्रथम आळा बसला पाहिजे.तरच असे अघोरी घ्रुनास्पद हत्येचे प्रकार होणार नाहीत.