चोपडा महाविद्यालयात दि.२९ जानेवारी रोजी ‘विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे’ आयोजन
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा मराठी अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.२९ जानेवारी, २०२५ रोजी प्रथम वर्ष कला मराठी या विषयाच्या द्वितीय सत्रावर आधारित ‘विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा.डॉ.एन.के.ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील हे भूषविणार असून बीजभाषक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राचे संचालक प्रा.डॉ.म.सु. पगारे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खान्देशातील सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक अशोक निळकंठ सोनवणे तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील त्याचप्रमाणे खान्देशातील अनेक नावाजलेल्या कवींची उपस्थिती लाभणार आहे. या चर्चासत्रात प्रथम वर्ष कला मराठी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेल्या ‘काव्यप्रबोध’ या पुस्तकात ज्या कवींच्या कवितांचा समावेश आहे, अशा खान्देशी कवी उपस्थित राहणार असून त्यांच्या कवितांवर सहभागी संशोधक प्राध्यापक शोधनिबंधांच्या सादरीकरणाद्वारे विचार मंथन व चर्चा करणार आहेत.
तरी या मराठी विषयाच्या विद्यापीठस्तरीय चर्चासत्रामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमधील संशोधक प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच चर्चासत्राचे संयोजक आणि मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ तसेच या चर्चासत्राचे समन्वयक डॉ.एम.एल.भुसारे यांनी केले आहे.