खो-खो विश्वचषक २०२५ अंतिम फेरीचा थरार आशियायी देशांतच भारतीय पुरुषांचा अंतिम सामना नेपाळ विरुध्द
भारतीय पुरुषांना द. आफ्रिकेने झुंजवल
भारतीय पुरुषांकडून द. आफ्रिकेचा १८ गुणांनी धुव्वा
गौतम एम. के. सामन्याचा मानकरी
नवी दिल्ली, १८ जानेवारी २०२५: इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय पुरुष संघांने उपांत्य फेरीच्या आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करून जरी अंतिम फेरीत स्थान मिळवले असले तरी त्यांना आज दक्षिण आफ्रिकेने कडवी लढत दिली. भारताने जरी हा विजय साकारला असला तरी आज दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंना विजयासाठी झुंजवल. हा सामना भारताने ६०-४२ असा १८ गुणांनी जिंकला.
आज मैदानात खो देण्यापासून ते खेळाडू बाद करण्यापर्यंत दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सूर मारताना दिसले. खुंट मारताना काही वेळा भारतीय खेळाडूंना कळलेच नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून कळत होते. त्यांच्या खेळाडूंचा वेग वाखानण्यासारखा होता. या वेगाच्या जोरावरच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पहिल्या डावात २० तर दुसऱ्या डावात २२ गुण असे ४२ गुण मिळवत भारतीय संघाला कडवी लढत दिली. मध्यंतराला भारताकडे २८-२० अशी फक्त ८ गुणांचीच आघाडी होती.
तिसऱ्या टर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेने आक्रमणाचा वेग वाढवत २२ गुण मिळवले जे सहज या विश्वचषकात इतर संघांना जमले नव्हते.
चौथ्या टर्नमध्ये भारताने १.५० मि. दक्षिण आफ्रिकेची पहिली तुकडी बाद केली तर पुढच्या ३३ सेकंदात दुसरी तुकडी बाद करून सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तिसरी तुकडीने १.४६ मि. संरक्षण करत लढत दिली. पण चौथ्या तुकडीला भारताने फक्त २२ सेकंदात बाद करून पहिल्या डावातील उट्टे काढले. तर पाचवी तुकडीने १.३१ मिनिटे मैदानात तग धरत पुन्हा एकदा सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला.
या सामन्यात भारताच्या प्रतीक वाईकर (४ गुण), आदित्य गनपुले (१ मि. संरक्षण ६ गुण), मोहित, सचिन भार्गो, अनिकेत पोटे (४ गुण) , गौतम एम. के. (१.२९ मि. संरक्षण व १० गुण) व निखील बी. सुयश गरगटे (१.०६ मि. संरक्षण) यांनी विजयात महत्वाची कामगिरी करत विजय साकारला.
सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू :
सर्वोत्कृष्ट आक्रमक: बोंगानी म्ट्स्वेनी (दक्षिण आफ्रिका)
सर्वोत्कृष्ट बचावपटू: सचिन भार्गो (भारत)
सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू: गौतम एम.के. (भारत)