जागतिक स्पर्धेसाठी जग खुलं आहे , संधीचे सोने करा’ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिला विद्यार्थ्यांना कानमंत्र

जागतिक स्पर्धेसाठी जग खुलं आहे , संधीचे सोने करा’ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिला विद्यार्थ्यांना कानमंत्र

 

 

डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधला राज्यपालांनी संवाद

 

जळगाव दि. 8 ( जिमाका ) सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा. कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालविता संधीचे सोने करा असा कानमंत्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, संचालिका केतकी पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पो.अधिक्षक डॉ महेश्वर रेडडी, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, सचिव डॉ. वर्षा पाटील,डॉ. सुहास बोरले, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक डॉ एन. एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की,

माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था उभारून भविष्यातील नेतृत्व घडविण्याचे कार्य केले आहे. देश आणि राज्यातील सरकारने आता दुर्गम भागातही शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरण देखील आता अंमलात येत असल्याने विद्यार्थ्यांने अनेक संधी उपलब्ध होणार आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे असा कानमंत्रही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून ते व्यक्तिमत्त्व घडवणे, मूल्ये रुजवणे आणि समाजाची करुणा व समर्पणाने सेवा करण्यासाठी असते असे सांगून डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात यांची महाविद्यालये प्रभावी शिक्षण देत असल्यामुळे ‘ नॅक ‘ नी नामांकन देऊन त्यांच्या अभ्यासक्रमांना प्रभावी श्रेणी दिल्याचे राज्यपालांनी यावेळी अधोरेखित केले.

*सप्टेंबर मध्ये जळगावला भेट दिल्याचे केले स्मरण*

सप्टेंबरमध्ये जळगावला आपण भेट दिली तेव्हा या भागाच्या प्रगतीसाठी असलेल्या अपार संधींनी मला प्रभावित केले. येथील विमानतळ लवकरच विस्तारित होणार असून त्यामुळे या भागाच्या दळणवळणात मोठी सुधारणा होऊन विकासाच्या अधिक संधी चालून येतील असे सांगून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा प्रगती आणि विकासाचे केंद्र म्हणून जलद गतीने पुढे येत आहे. अशा वेळी हे वैद्यकीय महाविद्यालय आधुनिक आरोग्यसेवेचे केंद्र बनू शकते असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

आपली आरोग्य सेवा जगभरात नावाजली जात आहे मात्र, उत्कृष्टतेसोबतच आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ व परवडणारी असणे आवश्यक आहे. आपल्याला आरोग्यसेवेची उत्कृष्टता आणि परवडणारा दर्जा यांचा समतोल साधावा लागणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी विशद केले.

राज्यपालांनी या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेले प्रश्न राज्यपालांना विचारली, राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अधिक वेळ न घालवता अधिकाधिक ज्ञान अवगत करून घेण्याचा सल्ला दिला.

 

राज्यपालांनी केली नेत्र विभागाची पाहणी ; रुग्णाशीही साधला संवाद

राज्यपाल राधाकृष्णन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांच्याकडून नेत्ररोग विभागातील रूग्णांची माहिती जाणून घेतली. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरले, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. नि.तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील आदी उपस्थित होते.