पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धाॲड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो संघाच्या निवड समिती सदस्यपदी निवड
नवी दिल्ली (क्री. प्र.): महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो महासंघाने (KKFI) पहिल्यांदाच होणाऱ्या खो-खो विश्वचषकासाठी भारतीय खो-खो संघाच्या निवड समिती सदस्यपदी नियुक्ती केली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर होणार असून, २४ देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
भारतीय संघाची अंतिम निवड प्रक्रिया दिल्ली येथे सुरू असलेल्या सराव शिबिरातून भारताच्या खो खो पुरुष आणि महिला संघाची अंतिम निवड ८ आणि ९ जानेवारी २०२५ रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणार आहे. या निवडीसाठी निवड समिती सदस्य म्हणून ॲड. गोविंद शर्मा यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
समृद्ध कार्यकिर्दीचा गौरव:
छत्रपती संभाजीनगरचे निवासी आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व संभाजीनगर जिल्हा खो-खो संघटनेचे माजी सचिव ॲड. गोविंद शर्मा यांचा क्रीडा क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि योगदान या नियुक्तीमागील महत्त्वाचे घटक आहेत. २०१६ पासून त्यांनी भारतीय खो-खो महासंघाच्या पुरस्कार समिती सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी खेलो इंडिया, महाराष्ट्र राज्य शालेय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा, आणि नेपाळविरुद्ध झालेल्या खो-खो कसोटी सामन्यांमध्ये प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी म्हणूनही उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.
२०१६ मधील इंदौर आणि २०२३ आसाम येथील आशियाई खो-खो स्पर्धांमध्ये त्यांनी तांत्रिक अधिकाऱ्याची भूमिका यशस्वीरीत्या निभावली आहे. याशिवाय, छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा मार्गदर्शक म्हणूनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनंदनाचा वर्षाव:
या निवडीबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, सचिन गोडबोले, आणि बालाजी सागर किल्लारीकर आदींनी ॲड. शर्मा यांचे अभिनंदन केले आहे.
निवड समिती:
गोविंद शर्मा, माजी सचिव व खजिनदार, (महाराष्ट्र खो-खो असोसिएशन), एम सीतारामी रेड्डी, उपाध्यक्ष, (केकेएफआय), उपकार सिंग विर्क, सहसचिव, (केकेएफआय), कु. सुषमा गोळवलकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त, एस. एस. मलिक, सचिव, केकेएडी, डॉ. मुन्नी जून (एमडीयू), रोहतक, नितुल दास, खो खो प्रशिक्षक (साई), कु. वंदना पी शिंदे, कर्नाटक, आनंद पोकार्डे, एनआयएस आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, कोल्हापूर. अशी निवड समिती असेल तर या समितीवर भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष व सरचिटणीस पदसिध्द म्हणून काम पाहतील.
खो-खोचा अभिमान:
या निवडीने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवा मान मिळवून दिला आहे. भारतीय खो-खो संघाला जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.