मामाच्या गावाला आले आणि निवडीची बातमी धडकली दोन भारतीय बंधूंची ऑस्ट्रेलिया खोखो संघात निवड
सोलापूर, दि. २३ डिसेंबर
मामाच्या गावाला आले आणि ऑस्ट्रेलियाच्या खो-खो संघात निवड झाल्याची बातमी धडकली. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या दोन भारतीय खेळाडू बंधूंची ऑस्ट्रेलियाच्या अंतिम खो-खो संघात निवड झाली. मंगेश आणि तेजस संदीप जगताप हे निवड झालेले बंधू आहेत.
दिल्ली येथे 13 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत पहिली जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धा होणार आहे. यात 24 देशातील पुरुष व महिला संघ भाग घेणार आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ही भाग घेणार आहे.
तेजस व मंगेश हे प्रत्येक वर्षी सुट्टीला सोलापुरात मयूर चिंचोरे या त्यांच्या मामाच्या गावाला सुट्टीला येत असत. यंदाही ते सुट्टीला आले होते. ऑस्ट्रेलिया संघात त्यांची निवड अपेक्षित होती. परंतु जाहीर झाली नव्हती. सोलापुरात आल्यावर सराव बुडू नये म्हणून त्यांनी सेवानिवृत्त राज्य शासकीय प्रशिक्षक व तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, किरण स्पोर्ट्स क्लबचे मोहन रजपूत व श्रीकृष्ण कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जुळे सोलापूर येथील वसुंधरा महाविद्यालयाच्या मैदानावर सराव सुरू ठेवला होता. आणि सराव सुरू असतानाच त्यांना निवडीचा मेल आला. पहिल्या वर्ल्डकपसाठी निवड झाल्याबद्दल दोघे बंधू आनंदी झाले.
2004 पासून जगताप कुटुंब ऑस्ट्रेलियातील सिडनीत आहे. तेजसचा जन्म पुण्यात, तर मंगेशचा सिडनीत झालाय. मंगेश हा बारावी शिकत आहे. तेजसने वाणिज्यची पदवी पूर्ण केली आहे. तो आपले वडील संदीप जगताप यांना फायनान्स कंपनीमध्ये मदत करत आहे. तेजस हा फुटबॉल तर मंगेश हा फुटबॉल व ऍथलेटिक्स खेळत होता.
—-
अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा
खोखोकडे कसे वळले या संदर्भात दोघे बातचीत करताना म्हणाले, दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात खो-खो सुरू होणार असे कळाल्यानंतर वडिलांनी आम्हाला खो-खो खेळात घातले. हिंदू स्वयंसेवक संघाच्या पुढाकारातून खो खोच्या वार्षिक स्पर्धा सुरू झाल्या. ऑस्ट्रेलियात सध्या खो-खोच्या 22 शाखा आहेत. आमच्या संघाचे नाव छत्रपती शिवाजी वेस्टमीड शाखा असे आहे. छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या पुण्याच्या सुखदा बापट या ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सराव सुरु केला. पहिल्या वर्षी आमच्या शाखेस उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदाच्या वर्षी आम्ही विजेतेपद पटकाविले. चार महिन्यापूर्वी आम्हाला कळाले की पहिली जागतिक खोखो स्पर्धा भारतात होणार आहे. त्यानुसार प्राथमिक संघात आमची निवड झाली होती. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे तीन महिन्यापासून खो-खोचा सराव सुरू आहे. दरवर्षी आम्ही मामाच्या गावाला सुट्टीला येतो. त्यानुसार यंदाही सोलापुरात आलो. सोलापुरात आम्ही सराव केला. आम्हाला ८ दिवस सत्येन जाधव, मोहन रजपूत व श्रीकृष्ण कोळी यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळाले.
आता पुण्यात जाणार असून पुण्यातही स्काऊट मैदानावर जगदीश नान्नजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहोत. त्यानंतर आम्ही दिल्लीला पहिली जागतिक खोखो स्पर्धा खेळण्यासाठी जाणार असून गौरव कांडपाल हे आमचे प्रशिक्षक आहेत. आम्ही या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे.
——
सोलापुरात सन्मान
आठ दिवसाच्या सरावानंतर सोलापुरात दोघांचा विविध संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. किरण स्पोर्टस क्लबच्या वतीने जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते, स्वामी विवेकानंद प्रशालेच्या वतीने प्राचार्य अंबादास पांढरे, वसुंधरा कला महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्य तानाजी देशमुख व शारीरिक शिक्षण संचालक अशोक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.