जळगावला प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगाचे केंद्र करावे – आ. तांबे
– प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगासाठी सरकारने योजना आणावी – आ. सत्यजीत तांबे यांची अधिवेशनात मागणी
प्रतिनिधी,
पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टीकमुळे प्रदूषण वाढत असल्याचे दिसते. मात्र जळगावात याच प्लॅस्टीकवर प्रक्रिया करून प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योग मोठ्या प्रमाणत वाढला आहे. मात्र प्लॅस्टिक रिसायकलिंग क्षेत्र संघटित नसून, याला अद्याप उद्योगाचा दर्जाही मिळालेला नसल्याने या व्यवसायाला चालना देण्यासाठी सरकारने एकादी योजना अंमलात आणण्याची मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी अधिवेशनात केली.
जळगावातील प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगास मागील पाच-सहा वर्षात चांगले दिवस आले असून, या व्यवसायातून जळगावात सुमारे दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगासाठी सरकारने अनुदान किंवा कोणती योजना आणली तर या उद्योगातून सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होऊ शकते. सरकारने जळगावला प्लॅस्टिक रिसायकलिंग उद्योगाचे केंद्र केल्यास निश्चित मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.
प्लॅस्टीकच्या वाढत्या वापरामुळे जगभरात प्लॅस्टीक प्रदूषणाबाबत मोठी चर्चा होण्यासह भारतातही ही समस्या गंभीर होत असल्याने उपाययोजना करण्याचे प्रयत्न होतात. इतकेच नव्हे यावर उपाययोजना म्हणून राज्यसरकारने प्लॅस्टीकबंदी केली. सर्वत्र प्लॅस्टिकमुळे प्रदूषण वाढत असल्याची ओरड होत असले तरी जळगावनगरीने त्यावर मात करीत केवळ प्रयत्न न करता प्रत्यक्ष कृती करून पर्यावरणपूरक उद्योगाच्या माध्यमातून पर्यावरण संतूलन राखले जात आहे.
जळगाव येथे प्लॅस्टीक उद्योग मोठ्या प्रमाणात असून यासाठी जास्तीत जास्त प्लॅस्टीक कचऱ्याचा वापर केला जातो. यासाठी देशभरातून दररोज ५०० टन प्लॅस्टीक जळगावात येते. त्यावर प्रक्रिया करून त्यापासून चटई, पीव्हीसी पाईप, ठिबक पाईप, जार, खुर्चा, बाटल्यांचे ट्रे तयार केले जातात. यामुळे दररोज देशातील ५०० टन प्लॅस्टीक कचऱ्याची जळगावात विल्हेवाट लावली जाते.