युवा सक्षमीकरण, संघटीकरण हे समाज विकासासाठी महत्वाचे
भुसावळ येथील बडगुजर समाजाच्या युवा मेळाव्यात तज्ज्ञाचा सल्ला; देशभरातील समाजबांधवाची हाेती उपस्थिती
भुसावळ (प्रतिनिधी) अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत युवा समिती, बडगुजर प्राऊड फाउंडेशन व बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने बडगुजर समाजाचा अखिल भारतीय स्तरावरील पहिला युवा मेळावा १० नाेव्हेंबर राेजी भुसावळच्या मोरया मंगल कार्यालयात झाला. यात तज्ज्ञांनी तरुणाईला मार्गदर्शन करताना नोकरीमुळे आपण मोठमोठ्या पदावर पोहचू शकतो त्यासाठी जिद्द निर्माण केली पाहिजे. युवा सक्षमीकरण व संघटीकरण हे समाज विकासासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व युवकांनी एकत्रित येऊन कार्य करावे. करिअर निवड करताना फोकस ठेवा असा सल्ला दिला. या मेळाव्यात देशभरातील समाजबांधव माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष सुरेश महाले हे होते. उद्घाटन अमोल बडगुजर (पुणे), राजेंद्र बडगुजर, प्रा. केतन बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रकांत बडगुजर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. प्रास्ताविकात युवा समिती प्रमुख लोकेश कोतवाल यांनी समिती करीत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. मेळाव्यात झालेल्या राेजगार मेळाव्यात शेकडाे युवक-युवतींना मल्टिनॅशनल कंपनीच्या प्रतिनिधींकडे मुलाखत दिली. यात २८ जणांना नाेकरीचे निवड प्रमाणपत्र तात्काळ देण्यात आले. अविनाश बडगुजर, प्रा. मिलिंद बडगुजर, सविता बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. महासमितीचे सचिव हिरालाल बडगुजर यांनी आभार मानले. कार्यक्रमास समाज जागृती मंडळ भुसावळ , बडगुजर प्राऊंड मंडळ, अखिल भारतीय महा समिती कार्यकारणी सदस्य व युवक समितीने मोलाचे सहकार्य केले.
तरुणाई रोजगार, उद्योगावर या दिल्या टिप्स
मेळाव्यात प्रा. मधुकर कोटवे (दिल्ली) यांनी अधिकारी व्हा जे करिअर निवडले त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा असे सांगितले. प्रा. केतन बडगुजर (मुंबई) यांनी शिक्षणच हिच खरी यशाची गुरुकिल्ली असते असे सांगितले. राजेंद्र बडगुजर (पुणे) यांनी ईव्ही पावर क्षेत्रातील रोजगाराविषयी माहिती दिली. प्रितेश बडगुजर (पुणे) यांनी कॅफे व्यवसाय व हॉटेल मॅनेजमेंट विषयी माहिती दिली. राजेंद्र बडगुजर (मुंबई) यांनी उद्योग कसा करावा हे सांगितले. गणेश रामसे (जर्मनी), दिनेश बडगुजर यांनी विदेशात शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. दिलीप बडगुजर व सुरेश महाले यांनी युवकांना एकतेचे महत्व पटवून दिले.
विविध क्षेत्रातील ४६ जणांच्या कार्याचा गाैरव
कार्यक्रमात बडगुजर समाजात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या ३८ युवक-युवती व ८ युवा समाज मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गाैरव करण्यात आला. या वेळी समाजातील युवा उद्योजकांचा परिचय देऊन त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुण्याना एका माळेत गुंफून एकसंघ असल्याचा संदेश देण्यात आला.