पाचोऱ्यातून पहिल्यांदाच महिलेला निवडून देण्याची संधी : वैशालीताई सुर्यवंशी

पाचोऱ्यातून पहिल्यांदाच महिलेला निवडून देण्याची संधी : वैशालीताई सुर्यवंशी

मंगळागौर स्पर्धेत नारीत्वाचा गौरव; सादरीकरणाला जोरदार प्रतिसाद

 

पाचोरा, दिनांक १७ (प्रतिनिधी ) : ”आज महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून आता पाचोरा मतदारसंघातून इतिहासात पहिल्यांदाच महिलेला आमदार म्हणून निवडून देण्याची संधी असून याचा सर्व महिलांनी योग्य वापर करावा !” असे आवाहन शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या मंगळागौर स्पर्धा कार्यक्रमात बोलत होत्या,

 

शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने ‘बाईपण भारी देवा’ या मालिकेत माता कैलादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या सावा मैदानात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी मयूर कुमार आणि धनश्री यांनी सुमधुर गितांची प्रस्तुती केली. यानंतर विविध ग्रुप्सनी मंगळागौरची एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली. यात परिमाता ग्रुप, स्वरांजली ग्रुप, आत्मनिर्भर नारीशक्ती ग्रुप, बाईपण भारी देवा ग्रुप, नवदुर्गा महिला मंडळ आदींसह अन्य मंडळांनी मंगळागौरीची विविध गाणी नृत्यांसह सादर केली. उपस्थित माता-भगिनींनी याला भरभरून दाद दिली. सर्व ग्रुपच्या सादरीकरणाची परिक्षण करून शेवटी विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.

 

यात स्वरांजली ग्रुपने पहिला क्रमांक पटकावला, दुसरे स्थान आत्मनिर्भर नारीशक्ती ग्रुपला मिळाले. तर तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे सहजयोग ग्रुप, स्त्री शक्ती ग्रुप व कलादर्पण या ग्रुप्सला पारितोषिके प्रदान करण्यात आली. उत्तेजनार्थ पारितोषीके नवदुर्गा ग्रुप, कलाविष्कार ग्रुप, बाईपण भारी देवा ग्रुप, चिरायू माता ग्रुप, संत नामदेव ग्रुप, स्वामीनी ग्रुप व देवदत्त ग्रुप यांना प्रदान करण्यात आली. सर्व ग्रुप्सचा सन्मात वैशालीताईंच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विजेत्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

 

या कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये कर्तबगारी बजावणाऱ्या मतदारसंघातील १०० पेक्षा जास्त महिलांना सन्मानीत करण्यात आले. एकीकडे मंगळागौरीची गाणी सुरू असतांना अधून-मधून अतिशय बहारदार पध्दतीत प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात येऊन यातील विजेत्यांना पारितोषीके देण्यात आली. तसेच लकी ड्रॉ काढून यातील विजेत्यांनाही बक्षिसे मिळाली. याच कार्यक्रमात सोनालीताई मनोहर चौधरी यांचा वाढदिवस देखील केक कापून साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतात नारीशक्तीला वंदन केले. त्या म्हणाल्या की, संस्कार हे फक्त मुलींनाच नव्हे तर मुलांनाही शिकवण्याची गरज आहे. आज महिला या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असतांना राजकारणात मात्र पिछाडीवर आहेत. पाचोऱ्यात तर आजवर कोणतीही महिला निवडून आलेली नाही. यंदा मी स्वत: महिलांच्या उत्थानासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून सर्वांनी माझ्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघात क्रांतीची मशाली प्रज्वलीत करावी असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात प्रियंका चौधरी व गाडगीळताई यांनी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तर या कार्यक्रमाचे अतिशय बहारदार असे सूत्रसंचालन गौरी बारी यांनी केले.

 

या कार्यक्रमाला कमलताई पाटील, वैशालीताई सुर्यवंशी, सुरेखा पाटील, जयश्री पाटील, कुंदन पांड्या, जयश्री येवले, योजना पाटील, अनिता पाटील, द्वारका पाटील, लक्ष्मी पाटील, सविता शेळके, मनीषा पाटील, पुष्पा परदेशी, बेबा पाटील, मनीषा पाटील, निता भांडारकर, उषा परदेशी, कल्पना पाटील, लीला चव्हाण, मीनाक्षी पाटील, सुरेखा वाघ, सुषमा भावसार, गायत्री पाटील, सोनाली चौधरी, रेखा शिरसाठ, सुरेखा वाघ, सिंधू वाघ, सोनाली पाटील, प्रतिभा पाटील, सुलोचना गुरव आदींसह मतदारसंघातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.