मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा : खानदेश सुपुत्र डॉ. शामकांत देवरे यांचा महत्त्वाचा वाटा
अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा झाली आणि महाराष्ट्र जनांचे अभिजात भाषेचे स्वप्न पूर्ण झाले. अभिजात मराठी भाषा समितीसह अनेक संस्था व मान्यवरांनी यासाठी विशेष प्रयत्न केले, याकामी खानदेशवासीयांचाही सहभाग राहिला. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव, तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक असलेले खानदेशचे भूमिपुत्र डॉ. शामकांत देवरे यांनी अभिजात मराठी भाषा पाठपुरावा समितीचे सदस्य सचिव म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
डॉ. देवरे यांनी अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे सदस्य सचिव यांसह भाषा सल्लागार समिती-सदस्य, त्याचबरोबर बृहन्महाराष्ट्र मंडळ व उत्तर अमेरिका समन्वय समिती सदस्य म्हणून विशेष कामगिरी बजावलेली आहे. त्यांच्याच प्रयत्नाने नुकतेच साने गुरूजीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अमळनेर येथे राज्य मराठी विकास संस्थेद्वारा पुस्तकांचे गाव उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हाही खानदेशकरांसाठी दुग्धशर्करा योग आहे.
उच्चविद्याविभूषित असलेले डॉ. देवरे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून खडकदेवळा ते गोंदेगाव अशी रोज पायपीट करीत आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी रोजंदारीवर काम करून पूर्ण केले. एम. ए.; एम. बी. ए.; एम. एल. एल. अँड एल. डब्ल्यू.; आणि पीएच. डी. पर्यन्त त्यांनी शिक्षण घेतले असून यापुढे पोस्ट डॉक्टरेट करण्याचा त्यांचा मानस आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात सुरुवातीला १२ वर्ष काम केल्यानंतर त्यांनी प्रा.राजेंद्र चिंचोले यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आपला अभ्यास सुरू ठेवला. सन २००१६ मध्ये महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागात प्रशासन अधिकारी म्हणून त्यांची प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर मागील पाच वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात कार्यरत आहेत.
विश्वकोश मंडळाचे उपकार्यालय वाई (सातारा) येथे असून खानदेशचेच सुपुत्र असलेल्या तर्कतीर्थांनी येथूनच विश्वकोश निर्मितीचे काम सुरू केले. याच कार्यालयात डॉ. देवरे रुजू झाल्यापासून त्यांनी मराठी विश्वकोशासारख्या संदर्भग्रंथाचे ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवण्याचे, तसेच वाचकांची जिज्ञासा जागृत ठेवण्याचे काम हाती घेत महाराष्ट्रभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांच्याकडे राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. मराठी भाषेचा राज्यभर आणि राज्याबाहेरही प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मराठी भाषा विभागाच्या महत्त्वाच्या चार विभागांपैकी दोन विभागाची धुरा या खानदेश सुपुत्राकडे विभागाने सोपविलेली आहे. त्यांच्याकडे सध्या अंदाजे ७० प्रकल्पाची जबाबदारी असून नुकत्याच मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन झालेल्या कवितेच्या आणि विस्तार योजना अंतर्गत असलेल्या पुस्तकांच्या गावाची प्रत्येक जिल्ह्यात पाहणी, चर्चा तसेच शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे हीदेखील जबाबदारी त्यांच्याकडे आहे. डॉ. देवरे यांनी अभिजात भाषा दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी ते घेत असलेले परिश्रम हे सबंध खानदेशवासीयांसाठी भूषणावह आहे.