शिर्डी, नाशिक व जळगावच्या विमान वाहतूक सेवेच्या प्रश्नांबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांची भेट

शिर्डी, नाशिक व जळगावच्या विमान वाहतूक सेवेच्या प्रश्नांबाबत आ. सत्यजीत तांबेंनी घेतली नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांची भेट

 

– महाराष्ट्राच्या विकासासाठी आ. सत्यजीत तांबे दिल्लीच्या दौऱ्यावर

– मुरलीधर मोहोळ यांना दिले निवेदन

 

 

प्रतिनिधी

 

महाराष्ट्राच्या विकासासाठी आमदार सत्यजीत तांबे नेहमीच आग्रही असतात. सध्या आ. तांबे दिल्ली दौऱ्यावर असून महाराष्ट्राच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत. नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि शिर्डी येथील विमान वाहतूकीचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच येथे विमानतळांच्या बाबतीत उद्भवत असलेल्या विविध समस्यांबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी देशाचे नागरी उड्डाण तसेच सहकार खात्यांचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची दिल्लीत भेट घेत निवेदन दिले.

 

राज्याच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात डोंगराळ प्रदेशातील कनेक्टिव्हिटीचा असमतोल दूर झाल्यास आणि लहान जिल्ह्यांना मोठ्या शहरांशी जोडल्याने राज्याचा विकास झपाट्याने होण्यास मदत होईल. तसेच पुणे विमानतळ सुधारणे, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला गती देणे आणि शिर्डी, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर येथील विमानतळांवर सेवा वाढवण्यावर भर देण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

 

पुणे विमानतळावर धावपट्टीचे सर्वेक्षण करण्यात येणार असून राज्यातील इतर विमानतळांची विकासकामे देखील याच गतीने पूर्ण करून त्यांना योग्य दर्जा द्यावा तसेच उड्डाणांची वारंवारता वाढवून विकासाला गती द्यावी. अशी विनंती आ. तांबेंनी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.

 

जळगाव विमानतळाच्या विकासासाठी केली मागणी

– जळगावहून फक्त २-३ उड्डाणे चालू आहेत, त्यामुळे विमानतळावरील कामकाज खूपच मर्यादित आहे. फ्लाइट वारंवारता खूप अनियमित आहे. बहुतेक वेळा विमानतळ बंद असते. जळगाव विमानतळापासून इतर विमानतळांशी कनेक्टिव्हिटी वाढवावी. मालाद्वारे कृषी उत्पादनांची निर्यात सुरू करावी.

 

नाशिक विमानतळाच्या विकासासाठी केली मागणी

– नाशिकचा विकास वेगाने होत असला तरी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा असताना देखील विमानतळावरून कोणतेही आंतरराष्ट्रीय उड्डाण चालू नाही. तसेच शेतीच्या बाबतीत नाशिक अव्वल असल्यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात सुरू करावी. आणि इतर शहरांशी चांगली विमानतळ कनेक्टिव्हिटी वाढवून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी.

 

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी केली मागणी

– पर्यटन/धार्मिक स्थळ असून देखील वाहतूक सुविधा पुरेशा उपलब्ध नाहीत. येथे फक्त दिवसा उड्डाणे चालू आहेत ती रात्रीच्या वेळेची देखील सुरू करावीत जेणेकरून भाविक आणि प्रवाशांना फायदा होईल. तसेच परदेशी भाविक वारंवार येत असल्यामुळे विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा द्यावा.