तुषार सुर्वे व संजीव ठाकूरदेसाई यांचा  कै.एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्काराने गौरव 

तुषार सुर्वे व संजीव ठाकूरदेसाई यांचा  कै.एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्काराने गौरव

 

मुंबई, २६ जून, (क्री. प्र. ) : मुंबई खो-खो खो संघटनेची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. खो-खो क्षेत्रात केलेल्या अमूल्य कार्याचा व दिलेल्या योगदनाचा गौरव म्हणून या सभेनंतर यावर्षीचा “कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार” अमर हिंद मंडळाचे संजीव ठाकूरदेसाई व सरस्वती स्पो. क्लबचे तुषार सुर्वे यांना सिद्धिविनायक मंदिर शेजारील कोहिनूर येथील वाॅव सभागृहात देऊन गौरवण्यात आले..

तुषार सुर्वे : १९७४ पासून खो खो खेळायला माहीम मुनिसिपल सेकंडरी शाळेपासून सुरुवात जी के पाटील सर यांच्याकडून लंगडी, खो-खो आणि ॲथलेटिक्सचे धडे घेतले. कै. विश्वास कोरे यांच्या सरस्वती स्पोर्ट्स क्लब माहीम येथे खेळायला १९७४ पासून सुरुवात केली. सरस्वती स्पोर्ट्स क्लब माहीमचे खेळाडू म्हणून तर त्यानंतर पंच प्रशिक्षक म्हणून श्री. तुषार सुर्वे यांनी काम पाहिले. सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीमला कै. विश्वास कोरे यांच्या पश्चात आपल्या इतर सहकार्यांसोबत समर्थपणे सरस्वती स्पोर्ट्स क्लब, माहीमला पुढे आणण्यात त्यांनी यश मिळवले.

मुंबई खो खो संघटनेत आपण १९८९ पासून खजिनदार म्हणून सुमारे १४ वर्षे काम पाहिले त्यानंतर प्रमुख कार्यवाह या नात्याने ३ वर्षे तर कार्याध्यक्ष म्हणून ४ वर्षे काम पाहिले. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी २०२४ पर्यंत काम केले. मुंबई खो खो संघटनेत कार्यकारणीवर तुषार सुर्वे हे सलग ३६ वर्ष कार्यरत राहिले आहेत. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन मध्ये पहिल्यांदा शासकीय परिषद सदस्य म्हणून व त्यानंतर ८ वर्षे खजिनदार म्हणून सुध्दा तुषार सुर्वे यांनी समर्थपणे धुरा सांभाळली व त्या पश्चात परत शासकीय परिषद सदस्य म्हणून २०२४ पर्यंत मुंबईचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर भारतीय खोखो फेडरेशन मध्ये विविध उपसमितीवर त्यांनी काम पाहिले आहे. खोखो क्षेत्रामध्ये खेळाडू ते कार्यकर्ता म्हणून त्यांनी ५० वर्षे पूर्ण केली आहेत.

संजीव ठाकूरदेसाई : संजीव ठाकूर देसाई यांचे शाळेचे शिक्षण पिटो विला हायस्कूल येथे झाले. तर महाविद्यालयाचे शिक्षण रूपारेल महाविद्यालयातून झाले. संजीव ठाकूर देसाई यांनी सुरवातीला १९७४-७५ मध्ये वैभव क्लबमधून खो-खो खेळायला सुरुवात केली व किशोरवयीन स्पर्धा तेथून खेळल्या. त्यानंतर १९७६-७७ मध्ये संजीव ठाकूर देसाई हे अमर हिंद मंडळ दादर येथे खेळाडू म्हणून दाखल झाले. १९८० ते १९९५ पर्यंत अमर हिंद मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले शाळेत खो-खो प्रशिक्षक म्हणून कार्य करताना अमर हिंद मंडळाचा महिलांचा संघ अखिल भारतात नावाजलेला होता याच दरम्यान त्यांनी अमर हिंद मंडळात विविध पदांवर काम केले व १९९५ साली मंडळाच्या संयुक्त सचिव पदावरून राजीनामा दिला व १९९५ साली समता क्रीडा मंडळ या कबड्डी संघाची स्थापना केले. पुढे सलग ६ वर्षे हा कबड्डीचा संघ मुंबईत एक विजेता संघ म्हणून अनेक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा जिंकत होता. मुंबई महापौर स्पर्धा सुद्धा हा संघ जिंकला.

संजीव ठाकूर देसाई सर यांनी २०१० ते २०२३ पर्यंत रूपारेल महाविद्यालय संघाचा खो-खो प्रशिक्षक म्हणून काम केले. २०१० ते २०१७ पर्यंत रूपारेल महाविद्यालयामध्ये जिमखाना सहाय्यक म्हणून काम केले त्यामुळे खो-खो व्यतिरिक्त इतर १६-१७ खेळांचा त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. मुंबई खो खो संघटनेत संजीव ठाकूर देसाई सर यांनी २००० ते २००६ या कालावधीत कार्यकारणी सदस्य म्हणून काम केले. महाराष्ट्र खोखो असोसिएशन मध्ये संजीव ठाकूर देसाई यांनी २००१ ते २००६ दरम्यान सांख्यिकी मंडळाचा अध्यक्ष तर २००६ ते २०१० तांत्रिक समिती सदस्य तर २०१० ते २०१४ दरम्यान तांत्रिक समिती अध्यक्ष म्हणून काम केले. २०१४ ते २०२० यादरम्यान स्पर्धा समिती सदस्य तर सद्यस्थितीत २०२१ ते आजपर्यंत राज्याच्या तक्रार निवारण समितीवर ते काम करीत आहेत.

महाराष्ट्रातर्फे तांत्रिक अधिकारी म्हणून हैदराबाद, आसाम व रांची या ३ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला व सुमारे ८ राज्य पंचवर्गांना मार्गदर्शन केले. किशोर/किशोरी १३ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग कुमार /मुली १० राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग पुरुष/महिला १२ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग तर किशोर/किशोरी ९ राष्ट्रीय स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग कुमार/मुली ९ राष्ट्रीय स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग पुरुष/महिला १४ राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग १० पश्चिम विभागीय स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग सुमारे २० अखिल भारतीय निमंत्रित स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग तसेच ५ भाई नेरुळकर चषक स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून सहभाग

या दोघांनी क्रीडा क्षेत्रात व विशेषत: खो-खो क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना “कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्कार” देऊन मुंबई खो-खो संघटने तर्फे गौरवण्यात आले आहे. सदर गौरव पुरस्कार संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष-अॅड. अरुण देशमुख व दीपक शिंदे (मार्केटिंग हेड – सामना) यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.

त्यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब (बाळ) तोरसकर, प्रफुल्ल पाटील,चंद्रकांत तरळ, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, प्र. कार्यवाह सुरेन्द्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, सहकार्यवाह – श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर, अक्षया गावडे-चिपळूणकर, रुपेश शेलटकर आदि खोखो प्रेमी उपस्थित होते.