पुणे पंढरपूर सायकल वारी एक अद्भुत अनुभव डॉ सुवर्णा पाटील
पुणे पंढरपूर वारी जी माझ्याकडून घडली त्याचं खरं श्रेय मी आमच्या स्पोर्ट्स मोटिवेशन या समूहाला देईल.
या समूहाचे सर्वेसर्वा श्री सुरेश खैरे महोदय यांच्यामुळेच हे शक्य झाले. खूप छान मार्गदर्तशन लाभले सुरेश सरांचे. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. आम्हाला मोटिवेट करीत होते हॅट्स ऑफ. तसेच समूहातील इतर सदस्य नयना बोराडे, प्रांजली, डॉ कश्मिरा,गौरव सर ,विशाल सर व इतर सदस्य. विशाल सरांची पहिल्यांदाच ओळख झाली होती परंतु असे अजिबात त्यांनी जाणवू दिले नाही . पहिले 50 km त्यांनी हळूहळू सायकलिंग केली फक्त मला योग्य मार्गदर्शन मिळावे त्यासाठी खरच ग्रेट.
या सर्वांचे मोटिवेशन याने प्रेरित होऊन ही सायकल वारी घडली.
खरं तर 1992 नंतर सायकलीला कधी हातही लावला नव्हता.
इतर ऍक्टिव्हिटीज चालू असायच्या.
ज्यावेळेस स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुपच्या संपर्कात आले त्यांचे मोटिवेशन हा मैलाचा दगड ठरला आणि त्यातून ही पहिली सायकलवारी घडली.
याचा अनुभव अचंबित करणार होता तो शब्दांत न मावणारा असाच आहे.
सायकलवारी सुरू करण्याच्या आधी मनात लाखो शंका कुशंका होत्या .
नवीन गिअर सायकल घेण्यापासून सुरुवात होती. त्यातही सहकार्य स्पोर्ट्स ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश महोदय यांनी मदत केली.
नवीनच सायकल चालवायला सुरुवात केली तर शरीराने वेदनांची पावती दिली.
सॅडल प्रॅक्टिस करणे, चढावर सायकल चालवणे या सर्व गोष्टींचे इन्स्ट्रक्शन्स मिळत गेले.
त्यानुसार सायकलची प्रॅक्टिस अडीच तीन महिने केली परंतु पुढे जायचं होतं 200 किलोमीटर आणि तेही एका दिवसात करायचं.
सायकलची प्रॅक्टिस चालू असताना आपण पंढरपूर वारी करणार हे मनात ठाम होते.
जसजसा वारीचा दिवस जवळ येत होता. तसं मन कच खाऊ लागले.
माझ्याकडून हे होईल का? माझे पाय खूप दुखतील, बसताना खूप त्रास होईल, सायकल वरून उतरताना अवघड होईल.
हायवे ला जाणार आहोत. ट्राफिक किती असणार? मोठमोठ्या गाड्या चालू राहणार. आपण एकटेच प्रवास करणार.
आपल्याला हा अनुभव नवीन आहे. आपले सोबती आपल्या सोबत राहणार नाही. प्रत्येक आपल्या स्पीडनुसार सायकल चालवत राहणार.
अशा कितीतरी शंका मनात होत्या परंतु हिंमत करून एक एक टप्पा मात्र गाठत होती.
पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता तर आता मागे फिरणे नाही.
आयुष्यात पंढरपूरही पहिल्यांदाच बघणार होते. पांडुरंगाच्या भेटीला आयुष्यात पहिल्यांदाच जात होते आणि तेही सायकल वरून जाणार हा एक वेगळा आनंद मनात कुठेतरी होता.
पांडुरंगाला बोलले :हे बघ पांडुरंगा तुझ्या भेटीला मी तर सायकलवर येत आहे परंतु बाकी जबाबदारी मात्र तुझ्यावर.’
सायकलवारी सुरू झाली. आयएएस या संस्थेने ही सायकलवारी अरेंज केली होती.
त्यांचे हे चौथे वर्ष होते.
अतिशय सुंदर अशी अरेंजमेंट त्यांनी केलेली होती. पंधरा ते वीस किलोमीटरवर हायड्रेशन पॉईंट होते. जेथे ज्यूस, चिक्की लिंबू सरबत ठेवण्यात आलेले होते. ब्रेकफास्ट पॉईंट होता. शंभर किलोमीटरवर लंच पॉइंट होता.
५० km आल्यावर रस्त्याच्या मधोमध तीन गाड्यांचा अपघात डोळ्याने बघितला परंतु कुणाला काही इजा झाली नाही. तरीसुद्धा मनात कसलीच भीती निर्माण झाली नाही.
थोड्या अंतरावर गेल्यानंतर एक रॉंग साईडने येणारा ट्रक डोळ्यासमोरच कलंडला हे अशी अनुभव घेत असताना सुद्धा मनात भीती निर्माण होत नव्हती हे आश्चर्य वाटले.
कारण की ते मन एवढं निर्विकार झालेलं होतं फक्त पांडुरंगाच्या ओढीने.
पेन आणि प्लेजर, वेदना आणि आनंद यापासून ते खूप दूर गेलं होतं काही काळासाठी.
98 किलोमीटर सायकलिंग करून झाल्यावर सायकलचे गेअर खराब झाले.
आता पुढे तर जाण होणार नाही आत्ताशी 98 झाले अजून निम्मे अंतर पार करणं आहे आणि सायकलने नाही म्हटले.
मन खूप खट्टू झाले.
आय एस चे सहकारी लगेच मदतीला येतात. त्यांच्या हेल्पलाइनवर फोन करून हेल्प मागवली. सायकलचे गेअर बघितल्याने त्यातले एकाने सांगितले की हे पूर्ण गियर बदलावे लागतील.
त्याला दोनच पर्याय जर एखाद्या सायकलीचा गेअर भेटला तर तो बसवू किंवा तुम्हाला एखादी सायकल भेटली तर ती सायकल देऊ. तशी तुमची वारी पूर्ण करा आणि हे दोन्ही पर्याय नसतील तर मात्र तुम्हाला टेम्पोत बसून पंढरपूरला जावं लागेल.
आता तर रडूच कोसळणार होते पांडुरंगाला म्हटले ‘मी तुला सायकलवर भेटायला येणार होते आणि तू हे काय केलं.’
लंच पॉईंटवर सर्व गेले. तिथे जेवण केलं पण जेवणात अजिबात लक्ष लागत नव्हते.
जेवणाची सोय अतिशय उत्तम होती. परंतु माझे सर्व लक्ष सायकलीवर आणि पुढच्या वारीवर. मन दुसऱ्या वाहनात बसून पंढरपूरला जायला तयार नव्हते.
पांडुरंगाला बोलले येणार तर सायकलवरच.
दीड तास तिथे मेकॅनिक शोधण्यात गेला. खरंतर तो इतरांच्या सायकली रिपेअर करण्यात बिझी होता.
माझ्या सायकलचे काम मेजर होतं. त्याने बघितलं हे उघडणार नाही. एक दोन गोष्टी सांगितल्या की नाही निघाला तर काही पर्याय नाही. तुम्हाला वाहनात बसून पंढरपूरला जावं लागणार.
आता तर डोळ्यातून अश्रू टपटप पडण्याची वाटच बघत होते. एवढे डोळे भरून आले होते.
नाही जायचं मला वाहनात बसून मन आतून ओरडत होते. पांडुरंगा कडे लहान मुलासारखे तक्रार करीत होते. मला सायकल वरच जायचं हट्ट करीत होते.
सायकलीचा गियर पार्ट निघतही नव्हता. मेकॅनिक नाही म्हणून मन हलवित होता तसे माझे मन अजून खचत होते. एकदाचा निघाला. त्याने दुसरा पार्ट आणून तिथे बसविला. सायकलीचे गेअर सगळे सेट केले आणि सायकल हातात दिली.
तुमची सायकल तयार झाली. एखाद्या लहान मुलाला आवडते खेळणे मिळावे आणि त्याने उड्या माराव्या एवढा आनंद मला झाला होता.
आईकडे हट्ट करावा आणि तिने तो पूर्ण करावा तशा त्या विठू माऊलीने माझा हट्ट पूर्ण केला. म्हणूनच बहुतेक तिला विठू माऊली म्हणतात त्याचा अनुभव आला.
त्यावेळेस एकच गोष्ट मनात होती की आपण सायकलवारी करणार बाकी जगातलं काहीच दिसत नव्हतं दिसत होती ती माऊलीची पंढरी.
सायकल काढली आणि पांडुरंगाच्या भेटीला निघाले. तो पांडुरंग 102 किलोमीटरवर माझी वाट बघत होता.
मध्ये जोरदार पाऊस लागला थोडा वेळ पाऊस थांबण्याची वाट बघत होते परंतु मन पुन्हा खेचत होते की नाही थांबू नको पाऊस जरी असला तरी पावसात जा परंतु थांबू नकोस भर पावसात सायकल सायकलवर टांग टाकली आणि विठू माऊलीला भेटायला पुन्हा सज्ज झाले एक एक टप्पा पार करीत करीत पंढरपूर जवळ येऊ लागली 25 किलोमीटरचा माइल स्टोन आला मग वीस किलोमीटर 15 किलोमीटर जसजसं किलोमीटर कमी कमी होत जात होते तसे तसे पाय जड होत आहेत असे वाटत होते माऊली समोरच उभी आहे मात्र भेटण्यास वेळ का लागतोय असं म्हणत होतं कारण की मन पुढे धावत होतं आणि पाऊल हळूच पडत होती. अद्भुत तो क्षण होता.
सकाळी पावणे पाचला सुरू झालेली सायकल वारी संध्याकाळी साडे पाचला संपली.
साडेबारा तासात 181 किलोमीटर करून मी पांडुरंगाच्या भेटीला गेले.
वारकरी संप्रदायाचे लोक म्हणतात की पांडुरंग आमच्या सोबत आहे ते काही खोटं नाही. पायी जाणारे वारकरी एवढ्या उत्साहाने कसे जातात. त्याचे उत्तर मिळाले होते.
जिथे भेटतील तिथे ते खाणार आणि पुढे आपली वारी करत राहणार कारण की त्यांना विश्वास असतो की पांडुरंग उपाशी ठेवणार नाही आणि आपल्या भेटीला नक्की येणार.
हा अनुभव मला त्या पंढरपुर वारीत आला.
अप्रतिम असा अनुभव माझ्यासारख्या नास्तिकाला देखील आस्तिक करण्याची ताकद ह्या वारीमध्ये होती.
एवढा मोठा बदल मला स्वतःत जाणवला.
काही सुटलं ,काही मिळालं. कुठे मग घायाळ झाल तर कुठे सावरलं. जे सुटत होतं त्यात मन दुःखी होत होतं जे मिळत होतं त्यात आनंद मानून घेत होत.
अशी पडझड करत करत शेवटी मी पंढरी गाठली आणि पांडुरंगाच्या भेटीस गेले.
जी ही भीती मनात होती की तिथे गेल्यावर आपल्या पायात गोळे येतील ,पाय खूप दुखतील, चालता येणार नाही, बसता येणार नाही, खूप अवघडल्यासारखं होईल ,
शरीर नाही नाही म्हणेल. तुम्हाला चढणं, उतरण मुश्किल होईल ज्या शंका कुशंका होत्या परंतु शरीराने वेदनेच नाव सुद्धा काढलं नाही.
कुठलीच वेदना किंवा त्रास मला झाला नाही याचं खूप आश्चर्य मला वाटलं.
सायकलची प्रॅक्टिस करीत असताना उतरताना चढताना जो त्रास होत होता तसा कसलाही त्रास मला घ्या 181 किलोमीटर मध्ये झाला नाही.
ही जादू होती की त्या पांडुरंगाची भेटीची ओढ होती सांगता येणार नाही.
पंढरपुरात गेल्यावर जाणवले की अरे या मंदिरात हा विठुराया नाही.
तर ही वारी सुरू झाल्यापासून प्रत्येक वारकऱ्यांच्या रूपात हा विठ्ठल वसलेला होता. पावलोपायोली तो प्रत्येक भक्ताच्या सोबतच होता.
सगळी वारी ही विठूमय झालेली होती.
विठ्ठलाचा नव्हता नुसता भास
वारीत अनुभवला त्याचा सहवास
संकटात त्याला दिला आवाज
धावून आला त्यावर मात करण्यास.
अशी ही सुंदर सायकलवारी पहिली वहीली सायकल वारी माझी घडली.
डॉ. सुवर्णा दिलीप पाटील चिंतामणी हॉस्पिटल
भडगाव जि.जळगाव